Saturday, September 13, 2014

पाली भाषेचे वर्ग आणि ब्राह्मणी भेसड


            मागील काही वर्षा मध्ये बौद्ध धम्माच्या प्रचारा मुळे आणि त्यातील अध्यात्मिक गोळी मुळे बरेच बौद्ध उपासक पाली भाषा शिकण्याकडे आकर्षित होऊ लागली आहेत. हे आकर्षण कोण्या व्यक्तीच्या आव्हानात्मक प्रचार अथवा लेखामुळे वाढलेले आहे, असे मला वाटत नाही. तसेही पाली भाषेचे आकर्षण बौद्धांसाठी साहजिकच आहे. विपस्सना, नित्य बुद्ध वंदना, विहारांना नियमित भेटी, लेण्यांचा इतिहास, लेण्यांना भेटी आणि त्यातील  शिल्प व कलेचे सुंदरतेचे अनुभव बौद्धांना पाली भाषे कडे आकर्षित करीत आहे. बौद्धांशिवाय पाली भाषा शिकण्या किंवा अभ्यासणा ची आवड किंवा आवश्यकता वाटणारा दुसरा वर्ग म्हणजे ब्राह्मण आहे. आज पाली भाषा मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे विद्यापीठातून शिकवली जात आहे. सुरवातीला ब्राह्मणांनीच पाली भाषा शिकविण्याचे कार्य हातात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आर एस एस मध्ये काम करीत असलेले बहुजन लोकांना पाली शिकविण्या साठी तयार केले. आर एस एस मध्ये काम करणारे आजही थोडे का होईना पण काही बौद्ध पण आहेत. अश्या बहुजनांना ब्राह्मण अत्युच्च आदरस्थानी आहे, तर आंबेडकरी बौद्धांचा त्यांना तिटकारा आहे.


            पाली भाषेचे वर्ग सर्वीकळे सुरु आहेत. असे लक्षात आले आहे की तेथील शिक्षक पाली शिकवीत असताना चमत्कारी बुद्ध प्रस्तुत करतात. इतकेच नवे तर whatsup वर चर्चा करतांना हे पाली शिकविणारी मंडळी अभ्यासू मंडळीसोबत मुजोरी करून त्यांना 'आधी पाली शिका, मग हुशारी करा' अशी गुंड भाषा वापरतात. पाली शिकविणारी मंडळी पेपर मधून प्रसिद्धी करीत असतांना असे विचार मांडतात की पाली शिकल्या शिवाय बौद्ध धम्म आणि जीवनाचे तंत्र कळू शकत नाही. तसे बहुतेक शिक्षक पुण्यातून तयार झाले आहेत असे कळते. या लोकांना हे समजणे गरजेचे आहे की आता भाषेची मर्यादा आजच्या काम्पुटर युगात नाहीशी झाली आहे. कुठली विशिष्ट भाषा अवगत झाल्याने मनुष्य सर्व ज्ञानी होऊ शकत नाही. चीन चे लोक आजही बुद्ध तत्वांना चीनी भाषे मधेच वाचतात. तीच गत जापान, श्रीलंका, बर्मा अथवा सर्वच देशांची आहे. भाषेची श्रेष्ठता जोपासणारे लोक मानवता वादी अथवा बुद्ध अनुयायी असूच शकत नाहीत. सम्राट अशोकाने बेबिलोनिअयन प्रदेशां मध्ये स्थानिक अर्मेनिअन आणि अफगान प्रदेशामध्ये अफगानी भाषे मध्ये बुद्ध तत्वांना कोरले. बाबासाहेबांनी सुद्धा 'बुद्ध आणि त्याचा धम्म' व इतर ग्रंथ सुद्धा जगात प्रचलित इंग्रजी भाषेतच लिहिले. त्यांनी महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी किंवा भारतीयांसाठी हिंदी मध्ये लिहिले नाही. त्यामुळे अंग्रेजी शिकल्या शिवाय बाबासाहेबांचे विचार लोकांना कळू शकत नाही, असे म्हणणे आयोग्य होईल. गैलीलीयो चे सिद्धांत समजण्या करिता रोमन किंवा लेटीन भाषाच यावी असे जर कोणी म्हणेल तो मुर्खात काढला जाईल. तसेच जीसस चे सिद्धांत समजण्या करिता हिब्रू भाषाच यावी असे म्हणणारे मुर्खातच मोजल्या जातील किंवा कुराण समजण्या करिता अरबी भाषा यावी असे म्हणणारे मूर्खच सिद्ध होतील. बाबासाहेबांनी सर्व धर्म ग्रंथ इंग्रजीतच वाचलेत, म्हणजे बाबासाहेबांना कोणताच धर्म व्यवस्थित कडला नाही असे कोणी म्हणू शकतो का? थोडक्यात सांगायचे म्हणजे कुठलीही भाषा श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. भाषा मात्र संवादाचे माध्यम मात्र आहे. भाषेचे श्रेष्ठत्व अथवा कनिष्ठत्व सांगणारे, बौद्ध धम्माचे विरोधी ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी लोक आहेत. मग पाली भाषा जो शिकला नाही तो बौद्ध धर्म समजू शकत नाही, असे म्हणणाऱ्यांना काय समजावे?


            खरे तर पाली भाषा एकदम सोपी आणि मराठीच्या खूप जवळ आहे. व्याकरणाचा भाग सोडला तर बरेचशे शब्द मराठी भाषे मधे आढळतात. तसे प्रत्येक भाषेमध्ये पाली भाषेचे शब्द आढळतात. तमिळ लिपी किंवा पंजाबी भाषा किवा मलयालम तर पाली च्या अत्यंत जवळ आहे. पाली भाषेचे पुस्तक आता बाजारात उपलब्ध आहेत आणि सराव केल्यास पाली शिकता येते. पण ती भाषा आपल्या रोजच्या बोलण्यात वापरली जात नसल्या मुळे लगेच मराठी चे पाली मध्ये भाषंतर करायला अवघड होईल, मात्र पाली भाषेचे मराठी (अथवा अन्य प्रांतीय) भाषेत भाषंतर करणे सोपे होते. हाच अनुभव इतर कुठल्याही भाषे च्या शिकवणी ला लागू आहे. जसे की मलयालम शिकल्या नन्तर जर तिचा रोज प्रयोग होत नसेल तर माणूस भाषा तर विसरतोच, शब्द ही विसरतो. पण पाली भाषा भारतीय भाषांच्या जवळ असल्या कारणाने भारतीय माणसाला पाली एकदा शिकल्या नंतर लगेच विसरता येणार नाही. पाली भाषेत औ, त्र, अ:, श, ष, क्ष, रफार र, श्र ही अक्षरे नाहीत. पाली वरून संस्कृत भाषा निर्माण करताना ब्राह्मणांनी ही अक्षरे जोडलीत. आणि तसेच पाली लिपी वरून देवनागरी लिपी तयार केली. पाली लिपी ला ब्राह्मणांनी 'ब्राह्मी' लिपी म्हंटले जेणे करून ब्राहाम्नांचे वर्चस्व लिपी वर अबाधित राहील. पाली शिकविणारे पाली लिपी ला 'ब्राह्मी' लिपी म्हणण्यास सुद्धा कोटीचा दबाव टाकतात. त्याचे कारण समजत नाही.  'सब्ब' म्हणजे 'सर्व', धम्म म्हणजे धर्म, अख्खर म्हणजे 'अक्षर', पापस्स म्हणजे 'पापाचे', 'दुग्गती' म्हणजे 'दुर्गती' वगैरे वगैरे अश्या प्रकारे पाली भाषा हिंदी किंवा मराठी शी किती जवळ आहे हे लक्षात येते. पाली भाषेचे व्याकरण सुद्धा सर्वच भाषेच्या लोकांसाठी सोपे जाते. मात्र काही शब्दांचा अर्थ वेगळा आहे जसे 'राग' म्हणजे क्रोध नसून 'आसक्ती', 'पंडित' म्हणजे 'ब्राह्मण' नसून 'विद्वान', 'भगवान' म्हणजे काल्पनिक शक्ती नसून 'तृष्णेला नष्ट करणारा', 'अजा' म्हणजे 'बकरी', 'चेटक' म्हणजे 'दास', 'खेळ' म्हणजे 'थुंकी', वगैरे बगैरे. पण या शुल्लक अंतरासाठी पाली भाषेला चमत्कारिक स्वरूप अथवा 'दैवी' स्वरूप देण्याचा खटाटोप ही मंडळी करते आहे, त्यावरून या मंडळींचे उद्देश संशयास्पद आहेत.


            पाली भाषा कमीत कमी बौद्ध लोकांनी अवश्य शिकावी हा आग्रह योग्य आणि आवश्यक आहे, पण जो पाली शिकला नाही तो बौद्ध नाही असे म्हणता येणार नाही. तरी हा हकेखोर पणा पाली शिकविणारेंनी का रेटला याचा शोध घेणे गरजेचे आहे. हे पुढील उतारांवरून समजता येईल.


            काही दिवसा पूर्वी नवी मुंबई मध्ये पाली चे क्लासेस सुरु झाले. त्यात शिक्षिकेने पाली शिकवीत असतांना सांगितले की, "जेव्हा सिद्दर्थाचा जन्म झाला तेव्हा पुष्कळ दूर जंगलात असणारा असित मुनी सिद्दर्थाचे दर्शन घेण्यासाठी कपिलवस्तू मधे आला. पण सिद्धार्थ झोपला असल्या मुळे तो निराश होऊन परत जाऊ लागला, तेव्हा सिद्दार्थाने पाळण्यातच हालचाल केली आणि टुणकन उळी मारून आसीतमुनी च्या जटेत जाऊन बसला."  या शिवाय हे शिक्षक मंडळी बि के मोदी नावाच्या बदमाशाने तयार केलेल्या "बुद्ध सिरीयल" चे सुद्धा समर्थन करतात. मजेची बाब तर ही आहे की या पाली वर्गातील एका कट्टर आंबेडकरी विद्यार्थीनीने जेव्हा विरोध केला तेव्हा इतर विद्यार्थी तिलाच विरोध करू लागलेत. इतकेच नव्हे तर तिला वर्ग सुद्धा सोडून द्यायला म्हणालेत. इतर ठिकाणी सुद्धा अशाच घटना घडल्यात. काही ठिकाणी आंबेडकरी विद्यार्थांनी विरोध केला तर काही ठिकाणी ते गप्प बसलेत. हे शिक्षक मंडळी बाबासाहेबांच्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' यातील आलेले काही चमत्कारिक उताऱ्यांचे दाखले देतात. जसे असित मुनीला दूर जंगलात कळाले की बुद्धाचा जन्म झाला आहे, काही देवता आकाशातून फुलांचा वर्षाव करतात, बुद्धाने दिव्य दृष्टीने जाणले की त्याच्या गुरूंचा मृत्यू झाला आहे, बुद्धाचे पात्र उलट दिशेला वाहत जाते, ब्रह्म सहस्प्ती चा उल्लेख, महापारीनिर्वानाच्या वेळेस बुद्ध अनिरुद्धला रागावून देव लोकांना दर्शन घेऊ द्या म्हणतात, बाबासाहेब शेवटी पुन्ह जन्म घ्यावेयावे आणि बुद्धाने पुन्हा परत ही इच्छा करतात इत्यादी इत्यादी. या बदमाश शिक्षकांना हे कळत नाही की बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्याचा धम्म' स्वतः च्या हयातीत प्रकाशित केला नव्हता. बाबासाहेबांना तो ग्रंथ एडीट करायला वेळ मिळाला नाही हे जाणणे गरजेचे आहे. असो.


            बुद्धाच्या बालपणाचा चमत्कारी वृतांत माझ्या तरी अल्प- वाचना मधे आजपर्यंत आला नाही आणि तसेच ऐकण्यात सुद्धा आला नाही. याशिवाय पाली शिकविणाऱ्या शिक्षिकेच्या पुष्कळश्या बुद्ध चरित्रातील वृतान्तापैकी हा एक वृतान्त आहे. या प्रकरणाबद्दल महत्वाची बाब ही आहे की कुठल्यातरी बौद्ध साहित्य मधे हा वृतांत जरी असला तरी पाली शिकवीत असतांना असे चमत्कारी वृतांत सांगण्याची काय गरज आहे. काही काळा आधी मुंबई मध्ये पाली शिकलेले लोकांनी आपले अनुभव सांगितले की पाली विभागाचे शिक्षक बाबासाहेबांचा घोर विरोध करीत होते. ते विभागामध्ये बाबासाहेबांचा फोटो सुद्धा लावण्यास विरोध करीत होते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी तो फोटो मुंबई विद्यापीठामध्ये रातोरात लावून तो तिथून काढू नये या साठी काय काय केले होते त्याची रोमांचक कथा त्या वेळेस चे विद्यार्थीच सांगतील. भारतामधे पुन्ह बौद्ध धर्म पुनर्जागृत करणारे किंबहुना भारतीयांना पुन्हा बुद्धाची आठवण करून देणारे बाबासाहेब यांच्या फोटो ला विरोध करण्यात येतो आणि मग त्या बौद्ध धम्माच्या गोडव्या गात पाली भाषा शिका या साठी रेटा लावतात आणि मग हेच शिक्षक पाली शिकविताना चमत्कारी बुद्ध सांगतात, याचे काय रहस्य असू शकते याचा शोध घेणे आवश्यक आहे. इथे हे सुद्धा नमूद करावेसे गरजेचे आहे की हे शिक्षक हे सुद्धा म्हणायचे की बाबासाहेबांनी 'अभिधम्मपिटक' वाचलेच नाही. (बाबासाहेबानी म्हंटले आहे की 'अभिधम्मपिटक' सर्वात जास्त विध्वंसक आहे.)


            आज बौद्ध समाज ब्राह्मणांची बदमाशी ओळखू लागला आहे. तो बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा चे महत्व समजून त्या पाळू लागला आहे. त्या बौद्ध समाजाला पुन्हा संभ्रमित करून कच्च्या मेंदूच्या बौद्धांना पुन्हा अवतारवाद, चमत्कार, पुनर्जन्म या ब्राह्मणी मायाजाळ मध्ये कोंबण्या साठी पाली भाषा शिकविण्याचे आमिष दाखविणे हे एक मजबूत उपाय आहे. कारण पाली मध्ये लिहिलेले उतारे प्रत्यक्ष पुरावे वाटतात. पाली भाषा शिकवण्याच्या नावावर चमत्कारिक बुद्ध सांगितला की लोकांना पुनः अंधविश्वासाच्या गर्तेत लोटून ब्राह्मणवाद लादण्याचा या शिक्षकांचा क्रूर हेतू स्पष्ट होतो. कारण एका ठिकाणी कोणी जास्त विरोध केल्यास हे शिक्षक त्या चमू मध्ये  सावध पूर्वक शिकवितात, पण त्याच वेळेस दुसऱ्या ठिकाणच्या चमूला ते चमत्कार शिकविणे बंद करीत नाही. म्हणजे त्यांना येन केन प्रकारे ब्राह्मणवाद लादायचाच आहे हे स्पष्ट होते. या प्रयोगात ते यशस्वी होताना सुद्धा आढळत आहेत. या पाली शिकवनींचा परिणाम असा झाला आहे की काही वयस्कर विद्यार्थी स्वतःला अर्हत पदाला पोहचल्यागत भासवीत आहेत. ते धम्म चळवळी पासून दूर जावून एकाकी झाले आहेत आणि ध्यान साधनेत लीन झाले आहेत. काही विद्यार्थी धम्म चळवळी ला दोष देऊ लागले आहेत.


            हे  शिक्षक चमत्कारी अर्थात ब्राह्मणी बुद्ध लादतात पण त्याही उपर मुंबईतील काही बौद्ध लोक या शिक्षक लोकांची तोंडभर स्तुती सुद्धा करतात अथवा या पाली शिक्षकांचा विरोध सहन करीत नाही. याला कारण म्हणजे मुंबई मधे मोठ्या संख्यने एका विशिष्ट पट्ट्यातील बौद्ध लोक आहेत. हे बौद्ध लोक आजही मनातून हिंदू असून बुद्धाला चम्ताकारी स्वरूपातच स्वीकार करतात. बाबासाहेबांच्या बालपण क्षेत्रामध्येच विज्ञानवादी अथवा खऱ्या आंबेडकरी विचारांचा  प्रसार होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबई मधे चमत्कारी बुद्धाचा किंवा अवतारी बुद्धाचा प्रसार दिसतो. आणि त्यामुळेच पुण्यातून शिकून आलेल्या (किंवा पेरलेल्या) अश्या पाली शिक्षकांचे अथवा पाली शिकवण संस्थेंचे फावते. काही पाली शिक्षण संस्था आणि बौद्ध अनुयायी तैवान/कोरिया वरून मोफत वाटपा साठी उपलब्ध पुस्तकांचे सुद्धा प्रसारक आहेत. या पुस्तकांमधे पुनर्जन्म आणि चमत्कारी बुद्धाचा फापट पसारा आहे. माझ्या डोक्यात प्रश्न येतो या विदेशी संस्था आज पर्यंत आम्हाला का भेटत नाही. किंवा प्राचीन बौद्ध लेण्या स्तूप वाचविण्या साठी मोहीम राबविणाऱ्या लोकांना का मदत करीत नाहीत. ते यासाठी की या विदेशी संस्था भारतातील ब्राह्मणी लोकांद्वारे चालविले जातात. हे ब्राह्मणी लोक जपान, चायना, थाईलंड, श्रीलंका सर्व ठिकाणी जाऊन बौद्ध इतिहास, साहित्य आणि चळवळ ब्राह्मनिकृत करण्याचे काम करतात. प्राचीन काळात सुद्धा बुद्धघोष नावाच्या ब्राह्मण (५वे शतक) श्रीलंकेत जाऊन सिंहली त्रीपिटकांचे भाषांतर करून एक 'विशुद्धीमग्ग' नावाचा ग्रंथ सुद्धा पाली भाषेत लिहिला.  हा ग्रंथ पूर्ण पणे ध्यान साधने वर आणि त्यातून अलौकिक शक्ती/सिद्धी प्राप्त करणे वर आधारित आहे. तसेच भगवान बुद्धाचे जीवन चरित्र लिहिणारा सुद्धा 'अश्वघोष' नावाचा ब्राह्मणच होता. भगवान बुद्धाने आपल्या जीवन चरित्राला कधीच महत्व दिले नव्हते आणि तीच विचारधारा संत कबीर, महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा होती. भगवान बुद्ध म्हणाले होते माझ्या नंतर धम्मचतुमचा शास्ता आहे आणि बाबासाहेब म्हणाले होते की माझे कार्यच तुमच्या साठी मार्गदर्शन आहे. त्यामुळे या बुद्ध अनुयायांनी सुद्धा कधीच त्यांचे जीवन चरित्र लिहिण्याचे काम केले नाही. ते काम ब्राह्मणांनी केले. बाबासाहेबांचे जीवन चरित्र धनंजय कीर ने लिहिले.


            बौद्ध लोकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की 'सुत्तपिटक', 'विनयपिटक' आणि 'अभिधम्मपिटक' हे तीन 'तीपिटक' एकूण ३१ पुस्तकांचे संग्रह आहे. ''सुत्तपिटक' चे 'दिग्गकाय', 'संयुक्तनिकाय', 'अन्गुत्तरनिकाय', 'मझ्म्निकाय' आणि 'खुद्दकनिकाय' असे ५ भाग आहेत. हे संकलन आणि संपादन बुद्धाघोष द्वारे करण्यात आले. 'धम्मपद' हे 'खुद्दकनिकाय' चे २रे पुस्तक आहे आणि 'जातक कथा' १०वी पुस्तक. 'जातक कथा' बुद्धाच्या पूर्व जन्मात विविध प्राणी वगैरे विषयी आहेत, ज्याचा पुष्कळशा भाग संस्कृत मधे असून १५-१६ व्या शतका पर्यंत लिहिण्यात आल्या असा उल्लेख सापडतो. काही 'थेरवादी' लोक 'जातक' ला मानीत नाहीत. म्हणजेच 'तीपिटक' पूर्णपणे स्वीकार करण्या सारखे नाही हे स्पष्ट आहे. 'विनयपिटक' चे ५ भाग आहेत आणि 'अभिधम्मपिटक' चे ७ भाग. ब्राह्मण लोक 'धम्मपद' छापण्यास जास्त रस घेतात. पुण्यातील काही मंडळीनी 'धम्म्पदाच्या' आकर्षक पेकिग आणि मधुर गीतांच्या स्वरुपात सीडी सुद्धा प्रकाशित केल्या आहेत. धम्मपद छापण्याचे कारण म्हणजे यात २६व्या वग्ग मध्ये (अर्थात २६ व्या धड्या मधे) 'ब्राह्मणांचे' गोडवे गायले गेले आहे. कुठल्याही बौद्ध साहित्य वाचकाच्या पटकन लक्षात येईल की हा भाग विशिष्ट रूपाने तयार करून 'धम्मपद ' नावाच्या ग्रंथात शामिल करण्यात आला आहे. वाचकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की बुद्धाच्या महापारिनिर्वाना नंतर 'आनंद' आणि 'उपाली' यांनी बुद्ध प्रवचन विषद केले त्या वरून 'सुटत पिटक' आणि ''विनयपिटक' तयार करण्यात आले, असा उल्लेख आहे, तरी वरील आंशिक विवेचाना वरून लक्षात येईल की 'तीपिटकांमध्ये' मोठ्या प्रमाणात भेसड झाली आहे. प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा उपाली आणि आनंद बुद्ध-वचन विषद करीत होते, त्यावेळेस काय त्यांनी असे विषद केले का?, " की मी आता सुटत पिटक चा पहिला ग्रंथ दिग्गनिकाय सांगत आहो, त्यात पहिला वग्ग हा .... त्यानंतर मी आता धम्मपद सांगतो आहे त्याचे वग्ग हा? ........ "  इथे लक्षात घ्यावे की हे सर्व भाग नन्तर तयार करण्यात आले आणे ते करीत असतांना मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणी भेसळ झालेली आहे. आज तीपिटक भारतातच नव्हे तर जगात उपलब्ध आहेत. ते अशोकाने श्रीलंके मध्ये पाठ्विलेले भाग आहेत. मुल तीपिटक भारतात उपलब्ध नाहीत. काही भन्ते आणि हे पालीचे लोक म्हणतात बाबासाहेब ६व्या विश्व धम्म संगीतीला उपस्थित होते. प्रश्न हा आहे की २००० वर्षा नंतर धम्म संगीति का? बाबासाहेबांच्या काळातच का? असंग, दिग्ग्नाग अथवा हर्षवर्धन च्याकाळात का नाही ? किंवा लॉर्ड कनिंघम अथवा पाली लिपी शोधून काढणाऱ्या जेम्स प्रिन्सेप च्या काळात का नाही?  याचे उत्तर असे आहे. ब्रह्मदेश मध्ये घुसलेल्या ब्राह्मणांना बाबासाहेबांकळून या तीपिटक वर मोहर लावून घ्यायची होती आणि बाबासाहेबांनी जर बुद्ध धम्माच्या मुळ ग्रंथांनाच विरोध केला असता तर समाजा मध्ये  बौद्ध धम्मा बद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली असती. तरी बाबासाहेबांनी काही खुणा सोडलेल्या आहेत, जेणे करून येणारी पिढी हा धम्म चिकित्सक दृष्टीकोणातून योग्य तऱ्हेने पुढे नेईल. त्यांनी १५ ऑक्टोबर ला सकाळी नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत स्पष्टपणे जाहीर केले की त्यानी भारतीयांना दिलेला किंवा पुनर्जीवित केलेला बुद्ध धम्म हा 'हीनयान, महायान, सहजयान वगैरे कुठल्याच यानाचा अथवा  देशाचा अनुयायी नसून   'नवयान' आहे. त्यांना खुनवायचे होते की त्यांचा धम्म हा अस्तित्वात असलेल्या विचारांना अमान्य करतो आहे.


            त्यामुळे या पाली शिक्षकांचा हेतू स्पष्ट झाल्या मुळे त्यांना समजविण्या मध्ये वेळ वाया न घालविता बौद्ध जनतेला मोठ्या प्रमाणा वर जागृत करण्या साठी हा लेख लिहिण्यात येऊन आपल्या बौद्ध वृत्त पत्रांमध्ये छापून आणण्यास संपादकांना विनंती करण्यात आली आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे मनापासून आभार.



पण्डितो नागार्य सिरी परमो आनंदो

(डॉ परम आनंद)

राष्ट्रीय संयोजक, ब्लिस

८८०५४६०९९९